![]() |
मलकापूरात एम.डी. ड्रग्ज प्रकरणात जिल्ह्यातील पहिली कारवाई "मिशन परिवर्तन" अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 41,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत |
मलकापूर (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या "मिशन परिवर्तन" मोहिमेअंतर्गत मलकापूर शहरात एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही एम.डी. ड्रग्ज संबंधातील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरली असून, संशयिताकडून एकूण 41,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रासायनिक व तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीतून पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी मलकापूर शहरात संशयित मोहसीन ईजाज सैय्यद (वय 27, रा. पारपेठ, मलकापूर. मुळ रा. शाहूनगर, ठाणे) याला पकडले.
गस्ती दरम्यान पोलिसांची गाडी पाहून पळ काढणाऱ्या या संशयिताची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडून आरोग्यास अत्यंत हानिकारक असे एम.डी. ड्रग्ज 6.25 ग्रॅम (किंमत 31,400 रुपये) तसेच एक मोबाईल (किंमत 10,000 रुपये) असा मुद्देमाल मिळाला. त्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टच्या कलम 8(क), 22(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
"मिशन परिवर्तन" या उपक्रमाची सुरुवात दि. 26 जून 2025 रोजी जिल्ह्यात करण्यात आली असून, अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांना गजाआड करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेत आहे. मलकापूरातील ही कारवाई मोहिमेअंतर्गत पहिली मोठी यशस्वी धडक ठरली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष उपस्थितीत पोनि. सुनिल अंबुलकर यांनी ही मोहिम हाती घेतली. पथकात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे, चापोना. सुरेश भिसे, तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पो.कॉ. ऋषीकेश खंडेराव आदींचा समावेश होता.