![]() |
पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष यशस्वी |
महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा
मुंबई (प्रतिनिधी) पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” अंतर्गत २० कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव १०० कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे . या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू, अपघात किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या मदतीचा आधार आणखी भक्कम झाला आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकारांसाठी दरमहा मिळणाऱ्या मानधनाचा लाभ अधिक व्यापक स्वरूपात देणे शक्य होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की, “पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आम्ही तीन वर्षं अहोरात्र लढा दिला. शासन दरबारी अनेकदा निवेदने दिली, सात वेळा आंदोलने केली. सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्या संघर्षाला यश आलं आहे. निधीत २० कोटींची वाढ करून सरकारने पत्रकारांप्रती कृतज्ञतेची भावना दाखवली आहे. हा विजय व्हॉईस ऑफ मीडियाच्या नाही तर तो संपूर्ण पत्रकार बांधवांचा आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी नेहमी चांगली भूमिका घेतली आहे.
याचबरोबर राज्याध्यक्ष अनिल म्हस्के यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकारांच्या आकस्मिक संकटाच्या वेळी दिलासा देणारा हा निधी म्हणजे आशेचा हात आहे. निधी वाढल्याने अनेक कुटुंबांचे डोळे पुसले जातील. या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने राज्यभर सातत्याने लढा दिला आणि अखेर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. हा विजय पत्रकारांच्या एकतेचा आणि संघर्षशक्तीचा पुरावा आहे. पुढेही पत्रकारांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष अखंड राहील.”
सरकारच्या या निर्णयामुळे व्हॉईस ऑफ मीडिया संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पत्रकार बांधवांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त होत आहे. आज जीआर निघताच अनेक पत्रकार बांधवानी व्हॉईस ऑफ मीडियाचे आभार मानले.