![]() |
महिला आरोग्य शिबिरात 670 महिलांची तपासणी; आमदार सिद्धार्थ खरात यांची पाहणी, समाधान व्यक्त |
मलकापूर | प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" अभियानांतर्गत दिनांक 19 सप्टेंबर रोजी महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 670 महिलांनी आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.
शिबिरास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आरोग्य केंद्रातील सेवा, कर्मचारीवर्गाचा सेवाभाव व उपलब्ध सुविधांची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.
"दररोज 350 ते 400 रुग्णांना उपचार मिळत असून, गोरगरिबांच्या वेदनांवर कर्मचारीवर्ग कर्तव्यनिष्ठ भावनेने सेवा देत आहेत. ही सेवा इतर आरोग्य केंद्रांसाठी अनुकरणीय ठरेल," असे मनोगत आमदार खरात यांनी व्यक्त केले.
तपासणी व सेवा
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी करण्यात आली. तसेच पोषण आहार मार्गदर्शन आणि तणावमुक्त जीवनासाठी समुपदेशनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या वेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज ठाकरे, डॉ. विवेक कापसे (बालरोग तज्ञ), डॉ. विनीत देशमुख (औषधी तज्ञ), डॉ. स्वप्नील चव्हाण (महिला रोग तज्ञ), डॉ. विठ्ठल शिंदे (दंतरोग तज्ञ) तसेच गाभणे हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती
शिबिरास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव, घाटबोरी सर्कल प्रमुख गजानन राठोड, शाखा प्रमुख बाळू पाखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले.
आश्वासन
आशा स्वयंसेविकांनी शासनाकडे असलेल्या थकबाकीबाबत आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे मागणी केली. त्यावर प्रतिसाद देताना त्यांनी सांगितले की, “मी स्वतः या बाबतीत लक्ष घालून थकबाकी मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. गरीबांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. गोरगरिबांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.