![]() |
शिक्षकांच्या निरोप समारंभात गाव गहिवरले |
मलकापूर | प्रतिनिधी
दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, हिंगणा काझी येथे नुकतीच बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ शाळा व्यवस्थापन समितीतर्फे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजूभाऊ शेगोकार यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे संचालक श्री. मधुभाऊ फासे उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून मुख्याध्यापक श्री. सुरेश सैंदाणे सर, सौ. सुनीता सैंदाणे मॅडम, सौ. छाया पाटील मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी, विद्यार्थी, पालक व समिती सदस्यांनी आपल्या मनोगतातून सैंदाणे सरांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी शाळेचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांमधील घट्ट नातेसंबंध विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण मनोगतातून प्रकर्षाने जाणवला.
यावेळी मुख्याध्यापक सैंदाणे सर आणि सुनीता मॅडम यांनीही गुरु-शिष्याच्या नात्याचे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशाचे शिखर गाठावे, अशी भावनिक भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेले शिक्षक श्री. पद्माकर पाटील सर, श्री. दिनेश इंगळे सर, सौ. सोनाली पाटील मॅडम यांचा देखील सत्कार करण्यात आला. शेवटी गुरुजनांना निरोप देताना विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्री. शंकरसिंग सोनोने, सरपंचपती श्री. संजयभाऊ तायडे, उपसरपंच श्री. अमोलभाऊ फासे, सदस्य श्री. संजू दिपके, श्री. मोहन गंगतीरे, श्री. शांताराम पाचपोर, श्री. दरबारसिंग शिंदे, श्री. गोपाल उगले, श्री. संघपाल शिरसाट, श्री. गोकुळ फासे, पोलीस पाटील श्री. विनोद फासे तसेच माजी अध्यक्ष व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पद्माकर पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन श्री. दिनेश इंगळे सर यांनी केले.