![]() |
धरणगाव हायवेवर भीषण अपघात; एअरबॅगमुळे प्रवाशांचे प्राण वाचले |
मलकापूर | — मोहम्मद सरवर, विशेष प्रतिनिधी
दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्यातील धरणगाव येथे हायवे क्र. 153 वर एक भीषण अपघात झाला. नांदुरा कडून जळगावच्या दिशेने जात असलेली फोर्ड फिगो (क्र. MH26 BC 4268) कार उडानपुलाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. RJ09 GD 1437) जोरदार धडकली.
अपघात इतका जबरदस्त होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. सुदैवाने गाडीतील एअरबॅग उघडल्याने प्रवाशांचा जीव वाचला. मात्र काही जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
अपघातानंतर घटनास्थळी मलकापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले व थांबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पथकाच्या मदतीने परिश्रम घेतले. सध्या या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.