![]() |
मुक्ताईनगर : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध |
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकार संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित गुंडांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच प्रवेशकर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
पत्रकारांनी नमूद केले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात ३०० पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४३ प्रकरणांमध्येच या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. शासनाकडून या कायद्याच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी व प्रलंबित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिव विठ्ठल धनगर, विनायक वाडेकर सर, सचिन झनके, किरण पाटील, अतिख खान, पंकज तायडे, सुभाष धांडे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी रवी गोरे, सुमित बोदडे आणि मंगेश ढोले आदी उपस्थित होते.