![]() |
खंडणीखोरांना जेरबंद : स्थानीक गुन्हे शाखेची धाडसी कामगिरी |
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर खंडणीप्रकरणी स्थानीक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत १,६०० किलोमीटरचा पाठलाग करत अपहरण झालेल्या दोन इसमांची सुटका करून गुन्ह्यातील दोघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन पिस्तुल, एक जिवंत काडतूस तसेच कारसह एकूण ५,५१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटना आणि फिर्याद
दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी जयदीप नक्कु गिडा, रा. अडाजन, सुरत (गुजरात) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची क्रूड ऑईलची कंपनी असून जयेश उर्फ जिराग व हिम्मतभाई हे दोघे डिस्ट्रीब्युटर म्हणून मलकापूरात कार्यरत होते. दि. १९ सप्टेंबर रोजी ते बेपत्ता झाल्याने मिसिंग तक्रार दाखल होती. मात्र २२ तारखेला फिर्यादींना आरोपींकडून कॉल येऊन दोन्ही इसम त्यांच्याकडे बंदिवान असल्याची माहिती देण्यात आली. त्यांची सुटका करण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली व पोलिसांना कळवल्यास जीवघेणी धमकी देण्यात आली.
पोलिस अधीक्षकांचे आदेश
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी तातडीने तपासासाठी आदेश दिले. त्यानुसार पोनि. सुनिल अंबुलकर (स्थानीक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून आरोपींचा शोध सुरू केला.
अविरत पाठलाग
पथकाने कोणतीही विश्रांती न घेता सलग ४८ तासांत १,६०० किमी प्रवास करत मलकापूर, अकोला, अमरावती, चांदूर रेल्वे, परतवाडा, बैतूल, भोपाळ, नागटमार्गे कोटा (राजस्थान) येथे आरोपींचा पाठलाग केला. रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्याच्या मदतीने कोटा येथे आरोपींना मोठ्या शिताफीने पकडण्यात आले व अपहरण झालेले जयेश चंद्रकांत दत्तानी (४७) व हिम्मतभाई पंडीया (५२), दोन्ही रा. गुजरात, यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
अटक आरोपी
- मो. जुनेद मोहम्मद इमरान (३०), रा. अमरावती
- निहाल अहमद फिरोज अहमद (२६), रा. अमरावती
हस्तगत मुद्देमाल
- देशी बनावटीची २ पिस्तुल – किंमत ५०,०००/- रुपये
- जिवंत काडतूस १ – किंमत १,०००/- रुपये
- वेरना कार – किंमत ५,००,०००/- रुपये
एकूण मुद्देमाल : ५,५१,०००/- रुपये
पुढील तपास
अटक आरोपींना मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
या यशस्वी कारवाईसाठी मा. श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशानुसार, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक व प्रभार खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कामगिरी केली. यात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, ग्रे. पोउपनि. सुरेश रोकडे, पो.स्टे. मलकापूर शहराचे पोकॉ. संतोष पेंढारकर, ईश्वर वाघ, सुरज चौधरी, तसेच तां.वि.वि. बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.