![]() |
अंतुर्ली फाटा येथील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी |
जळगाव (अतिक खान यांजकडून)
अंतुर्ली फाटा येथून इंदोर-हैद्राबाद 753 एल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, याठिकाणी अंतुर्लीकडे येण्यासाठी उड्डाणपुलाचे काम देखील सुरू आहे. मात्र सदर उड्डाणपुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंतुर्ली व परिसरात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, 20 ते 25 गावांचा व्यापार केळीवर अवलंबून आहे. कोटीच्या घरात जाणारा हा व्यापार उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने अडचणीत येऊ शकतो. येथील केळीचे ट्रक तसेच कापूस, मका आदी शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्यांना सर्व्हिस रोडने 2 ते 3 किलोमीटर फेरी मारून ‘यू-टर्न’ घेऊन गावाकडे यावे लागेल. यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाढणार असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीला फटका बसणार आहे.
अंतुर्ली हे गाव 20 ते 22 हजार लोकसंख्येचे असून, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करताना दिसणारे हे पहिले मोठे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणचा उड्डाणपुल महत्त्वाचा असून त्याची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जोरदारपणे केली आहे. मागणी न मानल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.