![]() |
पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनेचा निषेध मलकापूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन |
मलकापूर :प्रतिनिधि। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता असतानाही पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. परवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांवर टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत अ. भा. मराठी पत्रकार परिषद संलग्नीत मलकापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकार संघाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळत असून, आरोपींविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी टोल वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तसेच सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून महाराष्ट्र राज्यात कुठेही ठेका देऊ नये, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार संघाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात 300 पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. यापैकी केवळ 43 प्रकरणांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रकरणे तपासण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी, प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच जिल्हास्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गठीत करून त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा पोलिस अधीक्षक असावेत. त्यामध्ये बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष तसेच समाजातील काही कार्यकर्त्यांचा समावेश करावा, अशीही पत्रकार संघाची मागणी आहे.
या निवेदनावर हरिभाऊ गोसावी, शेख अबीद बागवान, अनिलकुमार गोठी, उल्हास शेकोकार, नारायण पानसरे, जफर खान, निलेश चोपडे, मोहम्मद सरवर, अजय टप, शेख फईम, आदिलखान, सतीश दांडगे, बळीराम बावस्कार, एन के हिवराळे, करण झणके, रवींद्र गव्हाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
![]() |
पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनेचा निषेध मलकापूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन |