![]() |
मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची काँग्रेसची मागणी |
संदीप जोगी मुक्ताईनगर -
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून बाधित शेतकऱ्यांना रसकट हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की,मुक्ताईनगर तालुक्यात व संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात पावसाने पिके जमीन दोस्त झालेली आहे. ठिकठिकाणी ढगफुटी होत असून अतिवृष्टीमुळे तोंडी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेलेला आहे. शेतकऱ्यांची केळी, कापूस ,सोयाबीन मका यासारखी व इतर पिके मातीमोल झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या कंपन्या मोडले गेले असून शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. निसर्गाची अवकृपा ,वादळी वारे, विजेचा लपंडाव, रासायनिक खतांची कमतरता ,खतांचे गगनाला भेटलेले भाव यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक वाहून गेल्याने व काहींचे सडून कुजल्याने फवारणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे औषधांना पैसे नाहीत.त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून एक लाख रुपये सानुग्रह अनुदान हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात यावे या मागणीसह ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आलेली आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनावर प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अरविंद गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संजय चौधरी पाटील, काँग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अंतुर्ली शहर अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बी.डी गवई ,संजय पाटील यांच्या सह्या आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा उपस्थित होते