![]() |
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रमांनी “इंजिनिअर्स डे” उत्साहात साजरा |
मलकापूर :मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंजिनिअर्स डे” नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन आय. एस. टी. ई. लोकल चैप्टर तसेच प्रत्येक विभागाच्या आंतरर्गत असोसिएशनमार्फत करण्यात आले.
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागामार्फत टेक्निकल आर्टिकल रायटिंग ही स्पर्धा घेण्यात आली. विभागनिहाय विजेत्यांची निवड करून त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे समन्वयक प्रा. तेजल खर्चे मॅडम होत्या. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात “शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री. प्रशांत श्रींगारे (पोलीस उपनिरीक्षक, मलकापूर शहर) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशादर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी. पी. खरात होते. सिव्हिल अभियांत्रिकी विभागात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे सचिन तायडे (डेप्युटी इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव), अविनाश जमोडे (शासकीय ठेकेदार) व अक्षय भन्साली (उपाध्यक्ष, सिव्हिल अभियांत्रिकी असोसिएशन, ठेकेदार व शिक्षक) होते. सचिन तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “इंजिनिअर म्हणजे फक्त रचना करणारा नसून समाज बदलणारा व्यक्ती असतो” असे मत व्यक्त केले. अक्षय भन्साली यांनी सांगितले की, “प्रत्येक प्रकल्पामागे मेहनत, नवनवीन कल्पना आणि समाजासाठी असलेली जबाबदारी असते. अभियांत्रिकी ही केवळ नोकरी नसून समाज घडवण्याचा पाया आहे.” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व ज्ञानवर्धक संवाद साधला. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम. डी. पाटील होते. कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागामार्फत “ब्लाईंड कोडिंग” तसेच “टाकाऊ पासून टिकाऊ” या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. योगेश जाधव होते.
या सर्व उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, पॉलिटेक्निक इन्चार्ज प्रा. संदीप खाचणे, लायब्ररी इन्चार्ज प्राध्यापिका संगीता खर्चे तसेच विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर, प्रा. संतोष शेकोकर, प्रा. सुदेश फरपट, डॉ. अमोल मलोकर व प्रा. नितीन खर्चे उपस्थित होते. अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन व व्यावहारिक ज्ञान मिळाले. “इंजिनिअर्स डे” खऱ्या अर्थाने ज्ञान, नवकल्पना आणि समाजासाठी जबाबदारी यांची जाणीव करून गेला. संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, डॉ. गौरव कोलते, श्री. पराग पाटील व श्री. अनिल इंगळे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.