![]() |
जळगावात “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” कार्यक्रम संपन्न |
(अतिक खान) जळगाव!!
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज धार (मध्यप्रदेश) येथून “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” (SNSPA) या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला. सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत सुरु करण्यात आलेला हा उपक्रम २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट महिला आणि बालकांच्या आरोग्य सेवेला बळकटी देणे, सेवेची गुणवत्ता व पोहोच वाढविणे तसेच जनजागृती निर्माण करणे हे आहे. सार्वजनिक सहभागावर आधारित या मोहिमेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महिला व बाल विकास मंत्रालय यांचा सक्रिय सहभाग आहे. या माध्यमातून देशभरात १ लाख आरोग्य शिबिरे भरवली जाणार असून, विशेषतः महिला आणि बालकांच्या आरोग्य, पोषण व कल्याणावर भर दिला जाणार आहे.
याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी खासदार सौ. स्मिता वाघ, आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सौ. सीमा भोळे, सौ. रजनी सावकारे, सौ. भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. इंद्राणी मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
“स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” हे सरकारच्या “सेवा हाच संकल्प – भारत हिच पहिली प्रेरणा” या ध्येयाशी सुसंगत असून, अंगणवाडी केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून महिला व बाल आरोग्य सेवांचा विस्तार करण्यास मोठी मदत करणार आहे.
या उपक्रमातून निरोगी माता, सक्षम बालके आणि सशक्त कुटुंब घडविण्याचा संकल्प सरकारने अधोरेखित केला आहे.