![]() |
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती |
(अतिक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर (ता. १७ सप्टेंबर) :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” (SNSPA) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आयोजित आरोग्य शिबिराला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन आरोग्य सेवा सुविधांची पाहणी केली.
दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरात “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रम राबवला जात आहे. “सेवा हाच संकल्प – भारत हिच पहिली प्रेरणा” या भावनेतून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांसह मुलांसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, त्याची पोहोच व गुणवत्ता वाढवणे तसेच आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे होय. देशभरात १ लाख आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून, महिला व बालकांच्या विशेष आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यात पोषण, आरोग्य तपासणी, रोगनिवारण आणि कुटुंब कल्याणाशी निगडीत उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महिलांनी आरोग्य तपासणी आणि उपलब्ध सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच समाजातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सशक्त करण्यासाठी हे अभियान एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या ध्येयाकडे वाटचाल करणारे हे अभियान गांधी जयंती (२ ऑक्टोबर) पर्यंत देशभर सुरू राहणार आहे.