![]() |
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली येथे ‘सशक्त नारी – स्वस्थ परिवार’ कॅम्प संपन्न |
मुक्ताईनगर ( अतिक खान)
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित घडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सशक्त नारी – स्वस्थ परिवार’ कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन तसेच नेत्ररोगतज्ज्ञ उपस्थित होते. शेकडो महिला व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अंतुर्ली गावाच्या सरपंच सौ. सुलभा शिरतुरे, उपसरपंच श्री. गणेश तराळ, नरवेल गावचे सरपंच श्री. मोहन महाजन, डॉ. रमेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
शिबिरादरम्यान महिलांची आरोग्य तपासणी, मातृ व बाल संगोपन सल्ला, रक्त तपासणी, कुपोषण तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा पुरविण्यात आल्या. त्याचबरोबर संजीवनी ब्लड बँक, जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. विशेष म्हणजे डॉक्टर व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.
या कॅम्पच्या यशस्वी नियोजनात डॉ. प्रियदर्शी तायडे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. कृष्णा भोकरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. तर समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण देव, डॉ. योगेश सूर्यवंशी व डॉ. सुरेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व आशा वर्कर्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळवून दिल्या.