![]() |
नवी दिल्ली जेएलएन स्टेडियम येथे ‘जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’ जल्लोषात उद्घाटन संपन्न |
(अतिक खान मुक्ताईनगर)
भारत जगासमोर “क्रीडा आणि समावेशक” राष्ट्र म्हणून पुन्हा एकदा उदयास येईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (दि. २५ सप्टेंबर) – जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आज मोठ्या जल्लोषात ‘जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. उद्घाटनाची घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केली. २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून कतार (२०१५), युएई (२०१९) आणि जपान (२०२४) नंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करणारा भारत चौथा आशियाई देश ठरला आहे. ही स्पर्धा केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पॅरालिम्पिक समिती आयोजित करत आहे.
या वेळी विशेष संदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले –
“पॅरा खेळाडूंनी अडथळे तोडून आणि नवे बेंचमार्क निर्माण करून भारताची उदयोन्मुख क्रीडा शक्ती म्हणून ओळख मजबूत केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे खेळांना जीवनाचा मार्ग म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा लाखो लोकांना मिळाली आहे. धर्म, प्रदेश व राष्ट्रीयत्वाच्या पलीकडे जाऊन खेळ लोकांना जोडतात. WPAC 2025 चा अनुभव सहभागी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल.”
रंगतदार उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री डॉ. मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, खासदार श्रीमती कंगना राणौत, दिल्लीचे शिक्षण मंत्री श्री आशिष सूद, जागतिक पॅरा अॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख श्री पॉल फिट्झगेराल्ड आदी मान्यवर उपस्थित होते.
“भारतासाठी ही स्पर्धा अभिमान, प्रगती आणि उद्देश यांचे प्रतीक आहे. यंदा आम्ही ७४ खेळाडूंचा सर्वात मोठा पॅरा पथक तयार केला आहे. सुमित अंतिल, प्रीती पाल, दीप्ती जीवनजी, धरमबीर नैन आणि प्रवीण कुमार यांसारखे खेळाडू घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच सोनेरी इतिहास रचतील,” असे डॉ. मांडविया यांनी सांगितले.
भारताच्या क्रीडा महत्त्वाकांक्षेचा भाग म्हणून ही स्पर्धा महत्वाची ठरणार असून २०३० राष्ट्रकुल स्पर्धा व २०३६ ऑलिंपिकसाठी भारत सज्ज होण्याचा आत्मविश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “खेळ केवळ विजेते घडवत नाहीत तर शांती, प्रगती व कल्याणाला चालना देतात,” असे मोदी म्हणाले.
मागील वर्षी जपानमधील कोबे येथे झालेल्या स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना १७ पदके (६ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्य) जिंकून ऐतिहासिक सहावे स्थान मिळवले होते. यंदा घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंच्याकडून अधिक मोठ्या यशाची अपेक्षा आहे.
![]() |
नवी दिल्ली जेएलएन स्टेडियम येथे ‘जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’ जल्लोषात उद्घाटन संपन्न |