खामगांव: सशस्त्र लूटप्रकरणी दोन आरोपी अटकेत, देशी कट्टा व स्कूटीसह मुद्देमाल जप्त
खामगांव, 3 ऑगस्ट:
खामगांव शहरातील बारादारी भागात घडलेल्या सशस्त्र लुटीच्या घटनेचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी सोहन गोपालदास चौधरी (वय 42), रा. बारादारी, खामगांव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 जुलै 2025 रोजी रात्री 12.25 वाजता ते दुकानाचा व्यवहार आटोपून अॅक्टिवा गाडी (MH-28 BU-6070) ने घरी जात असताना सुरुची पान मसालाजवळ पांढऱ्या स्कुटीवर तोंडावर मास्क लावलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील रु. 2,82,500/- रोख रक्कम असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी खामगांव शहर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 279/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(5), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा अत्यंत क्लिष्ट असून आरोपींनी कोणताही ठोस पुरावा मागे ठेवलेला नव्हता.
तथापि, CCTV फुटेज व सायबर विश्लेषणाच्या आधारे पोलीस तपास पथकाने कसून तपास करत आरोपींचा शोध घेतला. यामध्ये
- गजानन यशवंत गाडेकर (वय 35, रा. बाळापुर, जि. अकोला)
- योगेश दिगांबर पुरी (वय 37, रा. शेगांव, जि. बुलढाणा)
यांना 01 ऑगस्ट 2025 रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या चार दिवसांच्या पीसीआर दरम्यान पुढील तपास करून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी स्कुटी अॅक्सेस (किंमत ~60,000/-), देशी कट्टा (पिस्तोल) (10,000/-), तीन जिवंत राउंड (600/-), दोन मोबाईल फोन (30,000/-) असा एकूण 1,00,600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात कलम 312 भा.न्या.सं. सह 3 व 25 आर्म अॅक्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एन. पवार यांच्या नेतृत्वात सपोनि भागवत मुळीक, पोहेकॉ हेलोडे, मोठे, पोना सागर भगत, पोकॉ अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, गणेश कोल्हे, राम धामोडे, अमरदिपसिंह ठाकुर तसेच सायबर तज्ञ पोहेकॉ राजु आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे यांनी केली.
खामगांव शहरात घडलेल्या या धाडसी चोरीचा छडा लावल्याने पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत असून, परिसरातील व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे.
#खामगाव #लूटप्रकरण #अटकेतआरोपी #देशीकट्टा #पोलीसकार्यवाही #खामगांवन्यूज #बुलढाणा #MaharashtraPolice #CrimeNews #RobberyCase #AccusedArrested #KhamgaonNews #BreakingNews #सायबरतपास #CCTVतपास #पत्रकारिता