आधार सेवा केंद्र वितरणात भेदभाव; CSC धारकांनाही पात्रतेत समाविष्ट करा!
मनोज जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बुलडाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या आधार सेवा केंद्र वितरण प्रक्रियेत केवळ "आपले सरकार सेवा केंद्र" धारकांनाच अर्ज करण्याची संधी देण्यात आली असून, शासकीय CSC (Common Service Centre) धारकांना यामधून वगळल्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
या निर्णयाला विरोध करताना भारत संग्रामचे जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन CSC धारकांनाही पात्रतेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
UIDAI व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार काम करणाऱ्या CSC केंद्रांना आधार सेवा वितरणाची संधी न दिल्यास, हजारो नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबरोबरच, न्याय्य संधीही नाकारल्या जातील, असे जाधव यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, "CSC केंद्रांमुळेच ग्रामीण व दुर्गम भागात नागरीकांना सहजपणे आधार नोंदणी, दुरुस्ती व तत्सम सेवा मिळू शकतात. शासनाच्या इतर अनेक सेवा देखील या केंद्रांमार्फत प्रभावीपणे पोहोचवल्या जातात. मग फक्त 'आपले सरकार सेवा केंद्रांनाच' संधी का?"
जाधव यांनी स्पष्टपणे मागणी केली की, "आधार सेवा वितरण प्रक्रियेत CSC धारकांना देखील समाविष्ट करून सर्व अर्जदारांना समान संधी आणि पारदर्शक निवड प्रक्रिया लागू करावी. अन्यथा, हा भेदभाव दूर करण्यासाठी उग्र आंदोलन छेडले जाईल."