अकोला | २ ऑगस्ट:
दोन कुख्यात गुन्हेगारांना तडीपार केल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने संतप्त आरोपींनी थेट पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी अकोल्यातील जनता भाजी बाजार परिसरात घडली. या हल्ल्यात दैनिक सुफ्फाचे संपादक हाजी सज्जाद हुसैन, तसेच त्यांचे पुत्र शहजेब हुसैन, साहिल हुसैन आणि शोएब मुशर्रफ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमीच ठरली रागाचे कारण!
अलीकडे अकोला व बाळापूर तालुक्यातील दोन कुख्यात गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी तडीपार करण्याची अधिकृत माहिती पोलिस प्रशासनाने पत्रकारांना दिली होती. यावर आधारित बातमी दैनिक सुफ्फासह अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. मात्र या बातमीनंतर संबंधित आरोपी चिडले आणि त्यांनी सुफ्फा कार्यालयाजवळ येऊन आधी शिवीगाळ केली, आणि नंतर थेट धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला.
कार्यालयासमोर थरकाप
जनता भाजी बाजार परिसरातील सुफ्फा कार्यालयाजवळ आलेल्या हल्लेखोरांनी संपादक आणि त्यांच्या मुलांवर हल्ला करत गोंधळ उडवला. या घटनेत चारहीजण गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पोलीस तपास सुरू, संशयित ताब्यात
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
पत्रकार संघटनांची तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर अकोल्यातील पत्रकार संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "बातमी मांडणे हा पत्रकाराचा हक्क असून, जर बातमीवरून अशा प्रकारे जीवघेणा हल्ला होत असेल, तर तो लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे," अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.