बुलढाणा जिल्ह्यातील शेती औजारे व शेतीमाल चोरी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखेने अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन स्वतंत्र गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासात दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, पोनि. सुनिल अंबुलकर यांनी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करून चोरी प्रकरणांमधील आरोपींचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. पथकांनी सखोल माहिती गोळा करून दि. 31 ऑक्टोबर रोजी दोन्ही प्रकरणांची उकल साधली. अटक केलेल्या आरोपींकडे चोरीस गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली, रोटावेटर तसेच ट्रॅक्टर असा एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अंढेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रकरणाची हकीकत
दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी पवन शिवदास चेके, रा. सरंबा यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की त्यांच्या शेतातून शेंदऱ्या रंगाची ट्रॉली चोरून नेण्यात आली आहे. या प्रकरणी अप.क्र. 281/2025 नोंद आहे. तसेच दि. 13 जून 2025 रोजी विकास संपत चेके यांच्या गोठ्यातून रोटावेटर चोरीला गेले होते, ज्याबाबत अप.क्र. 170/2025 प्रमाणे गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करून आरोपींचा शोध लावला.
अटक आरोपी
- गणेश आत्माराम वायाळ, वय 38 वर्षे, रा. सावरखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना
- अमोल सुरेश शेवत्रे, वय 33 वर्षे, रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना
अटक दिनांक : 31 ऑक्टोबर 2025
जप्त मुद्देमाल
- ट्रॅक्टर ट्रॉली : किंमत 75,000 रुपये
- रोटावेटर : किंमत 65,000 रुपये
- ट्रॅक्टर : किंमत 5,50,000 रुपये
एकूण जप्त मालकिंमत : 6,90,000 रुपये
मार्गदर्शन व कामगिरी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ASI ओमप्रकाश सावळे, दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, दीपक वायाळ, मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील कैलास ठोंबरे यांनी मोलाची भूमिका बजावली.

