बुलढाणा जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची मोठी कारवाई केली. मिशन परिवर्तन अंतर्गत करण्यात आलेल्या या तपासात पोलिसांनी एका इसमाला पकडत त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोनि सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगांव जामोद परिसरात गस्त करीत असताना ग्राम पळशी फाटा येथे संशयास्पद हालचाली करणारा एक इसम दिसला. स्टाफने त्याला थांबवून त्याच्या हातातील थैलीची झडती घेतली असता त्यात अवैध गांजा सापडला. सदर इसम अवैध अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अक्षय तेजराव कोकाटे, वय 32 वर्षे, रा. पळशी सुपो, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा असे आहे. त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा, किंमत एक लाख आठशे चाळीस रुपये, तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात 26 जून 2025 पासून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई एसपी निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तर अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगांव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोनि सुनिल अंबुलकर, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, चापोना सुरेश भिसे, निवृत्ती पुंड तसेच पोहेकॉ राजु आडवे यांच्या तांत्रिक विभागाच्या मदतीचा समावेश होता.

