![]() |
भरदिवसा घरफोडी करणारी महिला अमरावतीतून अटक – स्थानिक गुन्हे शाखेची मलकापूर गुन्ह्याची यशस्वी उकल |
मलकापूर (जि. बुलढाणा) – जिल्ह्यात वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत, पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून, मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्याचे निर्देश दिले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीतच गुन्ह्याची उकल करून आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अमरावती येथून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रविकुमार शिवाजी राठोड (रा. गांधारी, ता. लोणार, ह.मु. चैतन्यवाडी, मलकापूर) यांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती की, दुपारच्या सुमारास अज्ञात महिलेने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,23,157 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. 636/2025 भा.दं.सं. कलम 331(1), 305(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने काम करून गुन्ह्यातील आरोपी महिला सिमा परवीन नसीम शेख (वय 45, रा. हैदरपुरा, पो.स्टे. खोलापूरी गेट, अमरावती) हिला 18 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथून अटक केली. तिच्या ताब्यातून सोन्याची चैन, अंगठ्या, ब्रेसलेट, कानातील लटकन तसेच 50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 6,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सिमा शेख हिच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे नोंदलेले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड यांच्या देखरेखीखाली पार पडली. ही कारवाई पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) तसेच पो.हे.कॉ. राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा) यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तातडीच्या व प्रभावी कामगिरीमुळे मलकापूर शहरातील घरफोडी प्रकरणाची यशस्वी उकल झाली असून, आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.