![]() |
दीपांच्या प्रकाशात उजळले श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर,संत मुक्ताई समाधीस्थळावर दीपोत्सव सोहळा तेजोमय” |
संदीप जोगी.. मुक्ताईनगर :...
दिवाळीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ, मुळमंदिर श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही “दीपोत्सव – सन २०२५” मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
२१ रोजी संध्याकाळी मंदिर परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेकडो भक्तांनी मुक्ताई मातेच्या चरणी दीपदान करून परिसर उजळून टाकला. मंदिर, सभामंडप आणि समाधी परिसर दिव्यांच्या रांगोळ्या, फुलांच्या सजावटी व विद्युत रोषणाईने तेजोमय दिसत होता.
भजन, आरती आणि संतवाणीच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले.या प्रसंगी संत मुक्ताई संस्थानच्यावतीने स्वच्छता अभियान, प्रसाद वितरण व दिवाळी शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, वारकरी, महिला मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “संत मुक्ताईंच्या कृपेने सर्वांच्या जीवनात प्रकाश, शांती आणि समृद्धी नांदो,” अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
संत मुक्ताई संस्थानचे पदाधिकारी, सेवकवर्ग आणि स्थानिक भक्तांच्या सहकार्याने दीपोत्सवाचा सोहळा यशस्वीपणे पार पडला.