एसटी आगारात दर बुधवारी "प्रवासी राजा दिन" व "कामगार पालक दिन" साजरा होणार - प्रवासी आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम

Viral news live
By -
0
एसटी आगारात दर बुधवारी "प्रवासी राजा दिन" व "कामगार पालक दिन" साजरा होणार - प्रवासी आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रमबुलढाणा, (जिमाका) दि. 24 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दि. 15 जुलै 2024 रोजी पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी व सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर    प्रत्येक बुधवारी " प्रवासी राजा दिन" व " कामगार पालक दिन"  आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी हा दिन महिन्याच्या दर सोमवारी व शुक्रवारी आयोजित होत होता आता त्यात बदल करण्यात आला आहे. या उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व रा.प. कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.

 राज्य परिवहन, बुलढाणा विभागातील आगारामध्ये  हा दिन साजरा करण्याकरीता महामंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दि. 29 ऑक्टोबर रोजी बुलढाणा आगार, 12 नोव्हेंबर रोजी चिखली आगार, 19 नोव्हेंबर रोजी खामगाव, 26 नोव्हेंबर रोजी मेहकर, 3 डिसेंबर रोजी मलकापूर, 10 डिसेंबर रोजी जळगाव आणि 17 डिसेंबर रोजी शेगाव येथे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे.

या वेळापत्रकानुसार रा.प. आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार असून या वेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडु शकतात. तसेच दुपारी 3 ते 5 या वेळात कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार असून या वेळेत संघटना व रा.प.कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रका संबंधी व प्रमादिय कारवाई) अशा तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्याचे तात्काळ निराकरण करण्यात येतील.

जिल्ह्यातील सर्व राज्य परिवहन बस प्रवाशी  व  कामगार यांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे रा.प. महामंडळ, बुलढाणा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !