By | अतिक. खान
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासला आहे. मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला त्याच गावातील १५ ते २० गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गावातून उचलून नेऊन अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या गुंडांनी संजय वैरागर याच्या हातपायांवर मोटारसायकल घालून त्याचे हातपाय मोडले, तसेच फायटरने जबर मारहाण करून त्याचा एक डोळा निकामी केला. अत्याचार इतकेच थांबले नाहीत, तर आरोपींनी पीडिताच्या तोंडावर आणि शरीरावर लघवी करून अत्यंत घृणास्पद कृत्य केले.
या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात आणि जिल्ह्यात गेल्या काही काळापासून मातंग समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव दिसून येतो.
या पार्श्वभूमीवर भारतीय लहुजी सेना या संघटनेतर्फे आज दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामपूर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेने या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांना लेखी निवेदन देऊन म्हटले आहे की, या घटनेने समाजात प्रचंड संताप निर्माण झाला असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील. प्रशासनाने तातडीने आरोपींना अटक करून पीडित तरुणाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे


