![]() |
निंभोरा सिम येथे शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन म्हशी व दोन पिल्लांचा मृत्यू – लाखो रुपयांचे नुकसान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर शेतकऱ्याचा रोष |
रावेर (. अतिक खान):
रावेर तालुक्यातील निंभोरा सिम परिसरात घडलेल्या घटनेने कृषी विभागत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक शेतकरी हिरामण पाटील यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी आणि दोन म्हशींच्या छोट्या पिल्लांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे पाच वाजता दूध काढण्यासाठी शेतकरी पाटील गोठ्यात गेले असता दोन म्हशींपैकी एक म्हैस आणि दोन पिल्ले मयत अवस्थेत आढळून आले. उरलेली एक म्हैस जिवंत असल्याने त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकरी पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, शेतकऱ्याने खासगी डॉक्टरांना बोलावून जिवंत असलेल्या म्हशीचा उपचार सुरू केला असता, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मानसिक धक्काही बसला आहे.
आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेले शेतकरी आता अशा अपघाती नुकसानीमुळे आणखी संकटात सापडत आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणि मनोबल खचले असल्याचे बोलले जात आहे.
लेकराप्रमाणे प्रेमाने जोपासलेल्या जनावरांचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहावा लागणे ही कोणत्याही शेतकऱ्यासाठी अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.