![]() |
निकृष्ट दर्जाचे रेशन वाटप; सीधापत्रिका धारकांचा संताप |
(मुक्ताईनगर अतिक खान)
दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने गरीब व गरजू नागरिकांना रेशनचे वाटप करण्यात आले. मात्र, या रेशनचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारींनी नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काही ठिकाणी वाटप करण्यात आलेल्या गहू, तांदूळ व ज्वारीच्या गुणवत्तेबाबत लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “अन्नधान्य खराब दर्जाचे असून त्याचा वासही विचित्र आहे,” अशा तक्रारी अनेक सीधापत्रिका धारकांनी केल्या आहेत.
शासनाच्या योजना सणासुदीच्या काळात गरीबांना दिलासा देण्यासाठी असतात; मात्र, निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य मिळाल्याने नागरिकांच्या नाराजीचा सुर वाढला आहे. “जर सणासुदीच्या रेशनमध्येच असा दर्जा असेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कुठे मिळणार?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.