मलकापूर (प्रतिनिधी) – ईदगाह प्लॉट, पारपेठ परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात कचरा गाडी येऊनही कामगारांनी उघडपणे कचरा उचलण्यास नकार दिल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या मते, कचरा गाडी अजिबात भरलेली नसतानाही गाडीवाला "माझे ट्रिप पूर्ण झाले, मी परत येणार नाही" असे स्पष्ट सांगतो. त्यामुळे संपूर्ण परिसरातील कचरा रस्त्यावर आणि घरांच्या बाहेर पडलेला आहे. काही घरांमध्ये तर तब्बल १२ दिवसांपासून कचरा तसाच साचलेला आहे.
या गंभीर दुर्लक्षामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा सवाल आहे की –
- नगरपालिकेचे अधिकारी नेमके काय करत आहेत?
- कर्मचारी कचरा उचलण्यास नकार देतात, तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
- शेवटी या मनमानीला आळा घालणार कोण?
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.