'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' शुभारंभ
चिखली मतदारसंघाला पारितोषिक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू-आमदार श्वेताताई महाले
प्रतिनिधी किन्होळा : पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महात्मा गांधी जयंती ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'चा भव्य शुभारंभ आज किन्होळा येथे झाला.
ग्रामीण विकासाची नवी दिशा ठरवणारे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' या अभियानाविषयी माहिती देताना आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या, "या अभियानाचा उद्देश प्रत्येक ग्रामपंचायतीला सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख करणे आहे. यातून गावागावात शाश्वत विकास घडवून आणण्याची ताकद ग्रामपंचायतींना मिळेल. पाणी, वीज, रस्ते, शाळा, अंगणवाडी, महिला बचत भवन, ग्रामस्वच्छता यांसारख्या मूलभूत सविधा या अभियानादारे बळकट होणार आहे
"ज्या गावांना पाणंद रस्त्यांची गरज आहे, त्या प्रत्येक गावाला मी माझ्या आमदार निधीतून ५ लाख रुपये देणार आहे. हे समृद्ध पंचायत राज अभियान १७ सप्टेंबरपासून सुरू होत असून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात आपल्या चिखली मतदारसंघाला बक्षीस मिळालेच पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. मी नेहमीच आपल्या पाठीशी उभी आहे."
बुलढाणा तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांनी आतापर्यंत प्रत्येक गावात महिला बचत भवन, अंगणवाडी इमारती, जिल्हा परिषद शाळांसाठी वर्गखोल्या, गावजोड रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीजपुरवठा, नवीन ट्रान्सफॉर्मर, पाणंद रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.
गावांचा विकास, महिलांचे आरोग्य व सर्वांगीण प्रगती यांचा संगम घडवणारे हे उपक्रम ग्रामपंचायतींना व स्थानिक जनतेला नवे बळ देणारे ठरणार आहेत.
या सोहळ्यात माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच अर्चनाताई जाधव, गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पोफळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, ग्रामसेवक मदन कुटे, सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी व सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.