![]() |
राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक
मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील संजना हिवरकरने सुवर्णपदक पटकावले |
मुक्ताईनगर अतिक खान
वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे 29 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून 16 राज्यांतील 500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र संघाच्या विजयानंतर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा गावची कन्या संजना हिवरकर हिचा विशेष समावेश असून, तिने ठाणे-मुंबई येथे मुक्काम ठेवत प्रशिक्षण घेतले होते. तिच्या या यशामुळे तालुका तसेच जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
स्पर्धेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक, उत्तर प्रदेशाने दुसरा क्रमांक तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक मिळविला. पिंपरी चिंचवड (पुणे) येथील खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये असिफ शेख याने सुवर्णपदक पटकावत स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू हा मान मिळविला.
याशिवाय महाराष्ट्र संघातील खेळाडूंपैकी संजना हिवरकर (सुवर्ण), इसक्की तेवर (सुवर्ण), सुरज भोंडे (सुवर्ण), अमिन आत्तार (सुवर्ण), कृष्णा दिवेकर (सुवर्ण), अजित जैस्वाल (सुवर्ण), तेजस वारूळकर (सुवर्ण), अतिक शेख (सुवर्ण), हेमंत सिंग (रौप्य) यांनी पदकांची कमाई केली.
बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रीय थायबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष पी. वाय. आत्तार तसेच मंत्री दया शंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला नाझीम शेख, अरूणा हिवरकर, प्रियंका अचमट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. तर महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी, सचिव अजय खेडगरकर व खजिनदार गणेश मांढरे यांनी विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.