ईद मिलादुन्नबीनिमित्त उदयनगरमध्ये शांततापूर्ण मिरवणूक
उदयनगर: इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद (स.अ.स.) यांच्या पंधरा शे व्या जयंतीनिमित्त, अर्थात ईद मिलादुन्नबीच्या मुहूर्तावर उदयनगर शहरात आज, ५ सप्टेंबर रोजी डी जे व भोंगे रहित भव्य मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. शहरातील जामा मशिदीतून सुरू झालेली ही मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली.
या मिरवणुकीत शेकडो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. 'नारा-ए-तकबीर, अल्ला हू अकबर' आणि 'सरकार की आमद मरहबा' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीतील सहभागी, विशेषतः लहान मुलांनी, हातात तिरंगे आणि हिरवे झेंडे घेऊन पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता, एकता आणि बंधुत्वाच्या शिकवणीचा संदेश दिला.
ही मिरवणूक बाजार गल्ली, चिंचपूर रोड, बस थांबा मार्गे शांततेत पुढे सरकली आणि बुलढाणा रोड येथे तिचा समारोप झाला. या विशेष दिवशी अनेक ठिकाणी गोड पदार्थ आणि 'लंगर' (सामुदायिक भोजन) चे वाटप करण्यात आले, ज्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. या उपक्रमाने सामाजिक एकोपा आणि सलोख्याचे दर्शन घडवले.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निर्मळ यांच्या आदेशानुसार, उदयनगर बीटचे अंमलदार सुमेरसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली भुतेकर, मगर सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.