बनावट सोन्याच्या गिन्न्या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आरोपीला अटक
उदयनगर : बनावट सोन्याच्या गिन्न्या विकण्याच्या नावाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तरुणांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी या टोळीतील मध्यस्त आरोपी अनिल उर्फ अजय विनायक गुंजाळ (वय ३३, रा. सावंगी रेल्वे, ता. दारव्हा, जि. यवतमाळ ह. मु. कामरगाव, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, व उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातून केली.
१९ ऑगस्ट रोजी इसोली-सावरखेड रोडवर ही फसवणुकीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी याआधीच तीन आरोपींना अटक करून त्यांची १२ तासांत पोलीस कोठडी मिळवली होती. पण, या टोळीचा मध्यस्थ सूत्रधार पसार झाला होता.
कठोर तपास आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस ठाणे अमडापूरचे सहायक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी एक विशेष पथक नेमले. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी सुरडकर, प्रदीप चोपडे, आणि अमोल इंगळे यांचा समावेश होता. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अनिल उर्फ अजय गुंजाळ याचा वाशिम जिल्ह्यात शोध घेतला. आरोपी कामरगाव येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला २ सप्टेंबर रोजी रात्री ७.२४ वाजता ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर अमडापूर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या आरोपीच्या अटकेमुळे या मोठ्या गुन्ह्याचा छडा लागला असून, पुढील तपास सुरू आहे.
-याआधी तीन आरोपी अटकेत-
यापूर्वी पोलिसांनी इनेश सुभाष पवार, सुभाष रोहिदास पवार (रा. दधम, ता. खामगाव), आणि उमेश छगन शिंदे (रा. धानोरी, ता. चिखली) या तिघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, मध्यस्थ सूत्रधार फरार होता. आता त्यालाही गजाआड करण्यात यश आल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.