अमडापूर येथे प्रेषित मोहम्मद (स.अ.व.) जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर – १५० युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
उदयनगर: अमडापूर येथे ५ सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त अमडापूर येथे मुस्लिम समाजातील युवक मंडळाच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला गावातील तसेच परिसरातील युवक-युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल १५० युवकांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली.
प्रेषित मोहम्मद (स.अ.व.) यांनी मानवतेची सेवा, शांती व बंधुभावाचा संदेश दिला होता. त्याच शिकवणुकीनुसार युवकांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतात. कृत्रिमरीत्या रक्त तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.हे शिबिर जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा, अमडापूर येथे पार पडले. जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी व तज्ज्ञ यांच्या देखरेखीखाली शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. सहभागी सर्व रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.सामाजिक सलोखा आणि उत्साह या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, तसेच गावातील विविध धर्मीय बांधवांची उपस्थिती. सर्वांनी मिळून रक्तदान करून सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश दिला. गावात दिवसभर उत्सवी वातावरण होते.
शिबिर स्थळी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. युवकांनी दाखवलेली समाजसेवेची वृत्ती संपूर्ण अमडापूर गावासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.या शिबिराच्या माध्यमातून अमडापूर गावाने मानवतेच्या सेवेत मोलाचा वाटा उचलला आहे. युवकांचा उत्साह, सहभाग आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे हा उपक्रम गावाच्या सामाजिक ऐक्याचा आणि प्रेषितांच्या शिकवणीचा प्रत्यक्ष प्रत्यय ठरला.
