![]() |
शिरसाळा हनुमान मंदिर स्वागत कमान दुर्घटना प्रकरणी विनोद सोनवणे यांची माहिती |
मुक्ताईनगर (अतिक खान) –
योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगरचे संचालक विनोद नामदेव सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान दुर्घटनेबाबत माहिती दिली.
हिंगणा फाटा जवळील स्वागत कमान त्यांच्या डंपर चालकाच्या अनावधानामुळे धडकून कोसळल्याची घटना घडली. या संदर्भात सोनवणे म्हणाले की, “या घटनेत माझा अथवा ड्रायव्हरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मारुतीरायांची कृपा असेल तर माझ्याच हातून नवीन व भव्य कमान उभारली जाईल. याबाबत मंदिराच्या विश्वस्तांना आधीच कळवले असून माझ्या भाग्यानेच हे बांधकाम मी करणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, आधीपेक्षा अधिक भव्य आणि दिव्य अशी कमान उभारण्यासाठी लागणारी जागा शेतकऱ्यांच्या चर्चेतून मिळवली जाईल. पंचक्रोशीतील जनता जाणून आहे की, भक्तांच्या मागणीनुसार मी नेहमीच हनुमान मंदिरासाठी कार्य करण्यास तत्पर आहे.
दरम्यान, हिंगणा फाटा ते शिरसाळा या 1.5 किमी रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही योगराज कन्स्ट्रक्शनकडे सुरू आहे. सध्या रस्ता 5.5 मीटर असून तो 12 मीटरपर्यंत रुंद करायचा आहे. मात्र शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय कामास परवानगी न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे कामाला विलंब होत असून शासन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
“लवकरच हनुमान मंदिरासाठी भव्य स्वागत कमान व रुंद रस्ता उभारला जाईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.