अमडापूर पोलिसांची दमदार करवाई;
वि. न्यायालयाच्या तारखेवर गैरहजर राहणे पडले महागात, न्यायालयाने आरोपींना पाठविले कारागृहात
उदयनगर: अमडापूर पोलीस स्टेशनने फरार आरोपींविरोधात मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन तारखांवर गैरहजर राहणाऱ्या ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींविरोधात न्यायालयाने एनबीडब्ल्यू म्हणजेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या कारवाईमुळे फरार आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे.
अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील काही आरोपी सातत्याने न्यायालयाच्या तारखांवर गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले. या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी सुरडकर, नापोकॉ गजानन काकडे, पो.कॉ. धर्मराज पवार, रणजित सरोदे आणि मपोकॉ वैशाली आराख यांचा समावेश होता. या पथकाने आपल्या कार्यक्षेत्रात कसून तपास करून सहा आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती खालीलप्रमाणे आहे:
केस क्र. ९६/२०१२ (कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंवि): योगेश दशरथ लहाने (वय ३५), दशरथ कचरू लहाने (वय ६२), आणि भास्कर हरिभाऊ लहाने (वय ३६) - तिघेही रा. दहिगाव.
केस क्र. ३५१/२०१७ (कलम १४३, १४७, १४८, ३२४, ५०४, ५०६ भादंवि): धनराज मोहनसिंग मोहिते (वय ३५) - रा. हरणी.
केस क्र. ९७/२०१२ (कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि): दामोधर साहेबराव तायडे (वय ३५) - रा. पेठ.
केस क्र. ३४४/२०१६ (कलम ३७९ भादंवि): पंकज दगडू सोळंके - रा. घानमोडी, ता. चिखली.
या सर्व पोहेकॉ शिवाजी सुरडकर यांनी वॉरंट मधील आरोपींना १५ सप्टेंबर रोजी अटक केली आणि त्यांना चिखली येथील वि.न्यायालयात हजर करण्यात आले. वि.न्यायालयाने योगेश लहाने, दशरथ लहाने, भास्कर लहाने, दामोधर तायडे आणि पंकज सोळंके यांची रवानगी बुलढाणा येथील जिल्हा कारागृहात केली आहे.
या यशस्वी कारवाईसाठी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी पथकाचे प्रमुख पोहेकॉ शिवाजी सुरडकर व टीमचे अभिनंदन केले आहे. तसेच, तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी या आरोपींचा सातत्याने पाठपुरावा करून ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेक बाऊन्स प्रकरणातील कलम १३८ एन.आय. ॲक्ट अंतर्गत वॉरंट असलेले आरोपी देखील लवकरच अटक केले जाणार असल्याची माहिती पो.हे.कॉ. शिवाजी सुरडकर यांनी दिली आहे.
नागरिकांना आवाहन:
अमडापूर पोलिसांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे की, ज्या गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्या प्रकरणांमधील आरोपींनी नियमितपणे न्यायालयीन तारखांना हजर राहावे. जर ते गैरहजर राहिले, तर त्यांच्या विरोधात वि.न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.