![]() |
पुरग्रस्त गावांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट |
मुक्ताईनगर अतिक खान ।
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील अनेक गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काकोडा, बोरखेडा, राजुरा, जोंधणखेडा, हलखेडा, धुळे, चिंचखेडा खुर्द व कुऱ्हा या पुरग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पूरामुळे अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशुधनाची हानी, धान्य व घरगुती साहित्याचे नुकसान तसेच ग्रामीण रस्ते व दुकाने बाधित झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काकोडा येथील किरण सवळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला असून, रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या भेटीदरम्यान स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.