![]() |
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ची अंतिम तयारीचा मंत्र्यांकडून आढावा |
नवी दिल्ली (अतिक खान) – राजधानीत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या “जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५” च्या अंतिम तयारीचा केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मंगळवारी जवाहरलाल नेहरू (जेएलएन) स्टेडियमला भेट देऊन आढावा घेतला.
या स्पर्धेत जगभरातील १०० हून अधिक देशांतील पॅरा-अॅथलीट्स सहभागी होणार असून, भारत पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करत आहे. २५ सप्टेंबर रोजी रंगणार्या उद्घाटन समारंभाने या ऐतिहासिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
निरीक्षणादरम्यान अॅक्रेडिटेशन सेंटर, मेडिकल सेंटर, नव्याने उभारलेला वॉर्मअप व मुख्य मोंडो ट्रॅक आदी सुविधांची पाहणी करण्यात आली. याच ट्रॅकवर १०० पेक्षा जास्त राष्ट्रांतील जागतिक दर्जाचे पॅरा-अॅथलीट्स स्पर्धा करतील. भारताकडून ७३ पॅरा-अॅथलीट्स अव्वल स्थानासाठी उतरतील.
या वेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) चे अध्यक्ष श्री. देवेंदर झझारिया यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेळाडूंशी संवाद साधत दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या तयारीबाबत माहिती घेतली व आयोजक समितीला स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
“१०० हून अधिक राष्ट्रांचा सहभाग ही केवळ भारतासाठी अभिमानाची बाब नाही, तर आपल्या क्षमतेचे आणि खेळांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक पॅरा-अॅथलीटला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा व पूर्ण पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मांडवीय यांनी सांगितले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विश्वासार्ह ठिकाण म्हणून उदयास येत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.