![]() |
मुस्लिम बस्त्यांमध्ये कचरा गाडी का येत नाही? – पारपेट परिसरात नागरिकांचा संताप; नाले कचऱ्याने तुडुंब भरले, प्रशासनाकडे दुर्लक्षाचे आरोप |
मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील पारपेट परिसर आणि मुस्लिम बहुल बस्त्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून नगरपालिकेची घंटागाडी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, शहरातील इतर भागात हीच घंटागाडी नियमितपणे फिरताना दिसत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे “काही भागांना प्राधान्य, तर काही वस्तींकडे संपूर्ण दुर्लक्ष” असा आरोप नगरपालिकेवर होत आहे.
नाले कचऱ्याने तुडुंब भरले
परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. रस्त्यावर आणि गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिक आता थेट नाल्यांमध्ये कचरा टाकू लागले आहेत. परिणामी, नाले तुडुंब भरले असून पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि डास, माश्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
कर्मचारी फोन उचलत नाहीत
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करून तक्रार कळवली, परंतु कोणीही फोन उचलत नाही. “दररोज आम्हाला आश्वासन दिले जाते की गाडी येईल, पण प्रत्यक्षात कोणीच येत नाही. आमच्या भागाकडे नगरपालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे,” असा आरोप नागरिकांनी केला.
भेदभावाचा सूर
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतर भागांमध्ये नियमितपणे घंटागाडी फिरते, परंतु मुस्लिम वस्तींकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी असून भेदभावाचा सूरही उमटू लागला आहे.
आरोग्य धोक्यात
अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया आणि जठरांत्राचे विकार यांसारखे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “लहान मुले, वृद्ध आणि महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे घरात बसणेही अवघड झाले आहे,” असे स्थानिकांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ स्वच्छतेची व्यवस्था सुधारण्याचा इशारा दिला आहे. “जर त्वरित कचरा उचलला गेला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असे नागरिकांनी स्पष्ट केले.