ईद मिलादुन नबीनिमित्त हाजी सय्यद उस्मान मन्नू डोंगरे शाळेत नातिया मुशायरा उत्साहात
भक्तिगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध, कवींच्या रचनांना रसिकांची दाद
बुलढाणा – हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त अल मदिना फाउंडेशनच्या वतीने स्थानिक नगर परिषद हाजी सय्यद उस्मान मन्नू डोंगरे शाळा येथे नातिया मुशायरा (भक्तिगीताचा कार्यक्रम) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कवींच्या
सुमधुर रचनांनी आणि पैगंबर साहेबांच्या जीवनावर आधारित भक्तिगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शनिवार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० या वेळेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उर्दू कवी आणि सर्जन डॉ. गणेश गायकवाड होते, तर कवी मुस्तकीम अर्शद यांनी कुशलतेने सूत्रसंचालन केले.
या मुशायऱ्यात रियाज अन्वर बुलढानवी, ताहिर नकाश, आबिद नजर, इम्रान सानी, करीम दुर्वेश, इक्बाल जफर, फारुख नूर, अली आगाज, हाफिज इंतेसाम हुसैन, इजहार अर्शद, फिरोज सादिक आणि कलीम कैफ यांसारख्या अनेक नामवंत कवींनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या. त्यांच्या भक्तिपूर्ण कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
हा नात मुशायरा यशस्वी करण्यासाठी रियाज अन्वर बुलढाणवी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे ईद मिलादुन नबीचा उत्साह अधिक वाढला आणि रसिकांना एका अविस्मरणीय काव्यसंध्येचा अनुभव घेता आला.
