![]() |
उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे योग व प्राणायाम शिबिर संपन्न |
मुक्ताईनगर (अतिक खान)
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 29 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आयुष विभागाच्या वतीने योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शन योगतज्ञ श्री. प्रदीप सोनार यांनी केले. त्यांनी योग व प्राणायामाचे महत्व स्पष्ट करून आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त माहिती दिली. विशेषतः महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, त्यांचे निराकरण तसेच समुपदेशन या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत भूषण पाटील, डॉ. हेमंत जाधव, डॉ. इमरान खान तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश प्रभाकर राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली.
या अभियानाचा प्रमुख उद्देश महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढवणे, त्यांचे समुपदेशन करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे, अशी माहिती आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. भारतभूषण चिवडामन पाटील यांनी दिली.