आडकर फौंडेशनतर्फे डॉ. संजय चोरडिया यांचा ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने गौरव |
सर्वांगिण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नैतिकता
जपणे आवश्यक आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकापर्यंत कायद्याचे ज्ञान
पोहोचले पाहिजे. ॲड. भास्करराव आव्हाड यांच्याप्रमाणे सामाजिकतेचा आग्रह धरत ज्ञान
देण्याची वृत्ती असणाऱ्या प्रकाशवाटेची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य
संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांनी केले. सर्वांगिण विकास साधताना
संवेदनशीलता आणि बंधुता जपत दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य डॉ. संजय चोरडिया करीत
असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. आडकर
फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे
संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांचा सोमवारी (दि. 8) गौरव करण्यात आला. पुरस्कार
वितरण भारत सासणे यांच्या हस्ते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र
साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, डॉ. सुषमा चोरडिया महाराष्ट्र
व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद
आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारत सासणे पुढे म्हणाले, आजच्या सामाजिक नैराश्येच्या
वातावरणात आपण सर्वच पातळींवर विभाजित होत आहोत. अशा परिस्थितीत सुसंवाद, शांतता आणि
विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दर्जेदार, आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक शैक्षणिक
वातावरण निर्माण झाले पाहिजे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संविधानातील तरतुदी,
मुलभूत अधिकार याविषयी ज्ञान मिळणे आवश्यक आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, कायद्याचे देव समजल्या जाणाऱ्या
व्यक्तीच्या नावे मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. ॲड. आव्हाड यांनी समाजासाठी
अखंडितपणे कार्य केले. ते आदर्श शिक्षकही होते. त्यांच्या संकल्पनेनुसार मूल्याधारित
शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ॲड. आव्हाड हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व
होते. त्यांचा पुरस्काररूपी आशीर्वाद मी आनंदाने स्वीकारत आहे. सचिन ईटकर म्हणाले, ॲड. आव्हाड हे वैचारिक दिशा
देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या संवेदनशील
डॉ. चोरडिया यांना पुरस्कार देण्यात आला ही अभिनंदनीय बाब आहे. ॲड. आडकर यांनी आपले
गुरू ॲड. आव्हाड यांचा कृतज्ञतेचा वारसा जपत गुरूंच्या नावे पुरस्कार सुरू केला याचा
विशेष आनंद आहे. ॲड. अविनाश आव्हाड म्हणाले,
माझे वडिल व ॲड. आडकर यांचे नाते कौटुंबिक होते. वडिलांमधील अनेक पैलू मला त्यांच्यामुळे
समजले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ॲड. आडकर यांनी वडिलांच्या नावे पुरस्कार सुरू
करून आदर्श निर्माण केला आहे. प्रास्ताविकात
ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. ॲड. आव्हाड हे फक्त कायद्याच्या
क्षेत्रातच नव्हे तर समाजकारण, साहित्य, काव्य अशा अनेकविध क्षेत्रात कार्यरत होते.
त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पुरस्काराचे वितरण केले जात आहे. परिचय राजकुमार सुराणा यांनी करून दिला तर मानपत्राचे
वाचन वैजयंती आपटे यांनी केले. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांचे होते.