![]() |
जळगावात नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन |
अतिक खान (जळगाव)
जळगाव, दि. १४ सप्टेंबर २०२५ :
जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी आज रविवारी जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते. त्यांनी सांगितले की, “भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी देणारे जीवनमूल्य आहे. संमेलनाचा उद्देश संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करून त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करणे हा आहे.”
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात संविधानासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला. “सामाजिक असमानता, जातीयवाद आणि आर्थिक विषमता यामुळे संविधानातील समतेच्या तत्त्वांना धोका निर्माण झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे,” असे ते म्हणाले.
प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाची रूपरेषा सादर करताना “संविधान हे आपल्या देशाचे प्राणवायू आहे. हे संमेलन महिला, युवा, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असलेले सर्वसमावेशक व्यासपीठ ठरणार आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. प्रास्ताविक भारती रंधे यांनी तर आभार प्रदर्शन निरंजना तायडे यांनी केले. महिलांनी संमेलनात त्यांच्या प्रश्नांना व हक्कांना प्राधान्य द्यावे, तसेच ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी सभेतून पुढे आली.
या सभेला पुष्पा साळवे, मंगला बोदोडे, पूजा साळवे, हेमा बावस्कर, श्वेता मेश्राम, रंजिता तायडे, रत्नमाला बि-हाडे, संध्या तायडे, राधिका जावरे, कविता सपकाळे, सुनंदा वाघ, सरजू जाधव, संघमित्रा शिंगारे, शीला सुरवाडे, कुसुम सोनवणे, वंदना सोनवणे, मीराताई वानखेडे, राजश्री सोनवणे, दीपमाला सुरवाडे, संगीता मोरे, कल्पना ब्राम्हणे, कमल ढिवरे, सखुबाई जाधव आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सपकाळे व महेंद्र केदारे यांनी परिश्रम घेतले.