मुंबई – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांची वाढती गर्दी पाहता देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे.
जे. जे. उड्डाणपूल, हुतात्मा चौक मार्गे सीएसएमटीला जाणारे रस्ते तसेच मंत्रालयासमोरील मार्ग आणि मादाम कामा रस्ता ते मरीन ड्राईव्ह जंक्शन वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून, पूर्व मुक्त मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. सीएसएमटी परिसरातील बेस्ट वाहतूक थांबवण्यात आली असून, नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बससेवाही आंदोलन संपेपर्यंत बंद राहणार आहेत.
दक्षिण मुंबईतील फोर्ट व मरीन ड्राईव्ह परिसरात भगवा फेटा घातलेल्या आंदोलकांचे थवे घोषणाबाजी करत फिरताना दिसत आहेत. काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या रुळांवर उतरून आंदोलन केले तर काहींनी विजेच्या खांबांवर चढून घोषणा दिल्या.
दरम्यान, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या होत्या, मात्र त्यातून कोणताही निर्णय झाला नाही. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.
