मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आंदोलकांना उद्यापर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करून परिस्थिती सामान्य करण्याचे आदेश दिले आहेत.
आझाद मैदानात ५ हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी असूनही आंदोलक सीएसएमटी, मरीन ड्राइव्ह आणि उच्च न्यायालय परिसरात गोंधळ घालत असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
याचबरोबर, मुंबईत आणखी आंदोलक दाखल होणार नाहीत याची काळजी घेण्याचे, तसेच मनोज जरांगे यांना गरजेनुसार वैद्यकीय मदत मिळावी याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.
दरम्यान, आंदोलकांसाठी वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम खुलं करून देण्याची मागणी जरांगे यांच्या वकिलांनी केली होती, मात्र ती न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.