![]() |
काकोडा सरपंच तुळशीराम कांबळे अपात्र |
मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना पदाचा दुरुपयोग, ग्रामसभा न घेणे तसेच निधीच्या गैरवापराच्या आरोपांवरून अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिनांक 3 ऑगस्ट रोजी जारी केला.
कांबळे हे 2021 पासून काकोडा ग्रामपंचायतचे सरपंच होते. परंतु त्यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 36 नुसार ग्रामसभा घेण्याचे कर्तव्य पार पाडले नाही. तीन वर्षांत केवळ एकच ग्रामसभा घेण्यात आली होती. तसेच सरकारी निधीचा गैरवापर, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमितता, बोगस बिले तयार करून शासनाची फसवणूक, सदस्यांना विश्वासात न घेणे यासारख्या गंभीर तक्रारी त्यांच्या विरोधात नोंद झाल्या होत्या.
या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य मनोज निंबाजी हिवरकर, उर्मिला विलास भोजने व उषा नितीन सवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. सदस्यांच्या वतीने एडवोकेट राजेश तिवारी यांनी कामकाज पाहिले. ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. 140/2025 नुसार जिल्हाधिकारी न्यायालयात सुनावणी होऊन अखेर कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले.
यामुळे काकोडा ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे.