संत मुक्ताई संस्थानकडून सौ.दुर्गाताई मराठे यांना "आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार जाहीर"

Atik Khan
By -
0

मुक्ताईनगर: वारकरी भूषण सहकार महर्षी संत मुक्ताबाई संस्थानचे माजी अध्यक्ष कै. भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिर जुने मंदिर (कोथळी)श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे पंचदिनी ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यतिथीदिनी, संस्थेच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेला 'आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार' पहिला पुरस्कार संत मुक्ताई साहेबांच्या निष्ठावान सेवेकरी व कीर्तनकार ह.भ.प. सौ. दुर्गाताई संतोष मराठे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
हा पंचदिनी सोहळा ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू आहे. कार्यक्रमाची सुरुवात भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या हस्ते कलश पूजन व ग्रंथ पूजनाने झाली. या सोहळ्याचे व्यासपीठ ह.भ.प. संदिपान महाराज खामनीकर हे सांभाळत आहेत. ११ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यतिथीदिनी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
'आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार'
कै. भाऊसाहेब पाटील यांचे जावई अण्णासाहेब जयंतराव महल्ले आणि सुनंदाताई जयंतराव महल्ले यांच्या संकल्पनेतून यंदापासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. हा पुरस्कार संत मुक्ताई साहेबांची सेवा, निष्ठा आणि अध्यात्म प्रवचनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येईल. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, रु. ११,०००/- रोख रक्कम आणि संत मुक्ताई साहेबांचे मानाचे "महावस्त्र" असे आहे. यंदाचा हा मानाचा पहिला पुरस्कार ह.भ.प. सौ. दुर्गाताई संतोष मराठे यांना जाहीर करण्यात आला आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशी माहिती संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील तसेच संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी दिली.

ह.भ.प. सौ. दुर्गाताई मराठे: एक निष्ठावंत कीर्तनकार
ह.भ.प. सौ. दुर्गाताई मराठे यांनी कीर्तन व अध्यात्मसेवेला आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांनी आतापर्यंत ३,००० हून अधिक कीर्तने केली असून, अल्प मानधनावरही निरपेक्ष भावनेने त्यांनी ही सेवा केली आहे. त्यांचा 'कीर्तन हे माझं साधन नसून साधनाचं साध्य आहे' हा विचार त्यांच्या संतवृत्तीची साक्ष देतो. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी 'राष्ट्रीय स्त्रीरत्न पुरस्कार' तसेच इतर अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांकडून गौरवण्यात आले आहे. त्यांच्या निस्सीम सेवेमुळे आणि प्रामाणिक, सुसंस्कृत व प्रभावी कीर्तनशैलीमुळे त्यांना आदराने पाहिले जाते.

कै. भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील: एक आदर्श व्यक्तिमत्व
कै. भाऊसाहेब पाटील हे श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांना 'वारकरी भूषण' आणि 'सहकार महर्षी' अशा उपाधींनी गौरविण्यात आले होते. शिखर बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. राजकीय पटलावर एक आदर्श नेता म्हणून त्यांनी सर्वसामान्यांची कामे केली. आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचे ते निस्सीम भक्त होते. भाऊसाहेब यांचं अध्यात्मासह सहकार , शेती, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठ योगदान आहे. आणि तत्कालीन वेळेस संस्थानचे अध्यक्ष असताना त्यांनी महिलांचा 'आदिशक्ती मुक्ताई' म्हणून नेहमी सन्मान केला. त्यांचे हेच विचार पुढे घेऊन त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महिलांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*