![]() |
सुभाषचंद्र बोस नगर परिसरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न आठवडी बाजारात कचराकुंडी उभारणीची संतोष बोरले यांची मागणी |
मलकापूर (प्रतिनिधी): सुभाषचंद्र बोस नगर परिसरातील आठवडी बाजार, चार खंबा भागात वाढत्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या भागात मटण व मच्छी मार्केट असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ओला कचरा तयार होतो. मात्र, कचराकुंडी उपलब्ध नसल्याने हा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय, कचऱ्यामुळे डास, माश्या, किटक वाढून संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या परिसरात तातडीने कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी. शक्य असल्यास कायमस्वरूपी सिमेंटची कचराकुंडी उभारून तिची नियमित साफसफाई करण्यात यावी. असे केल्यास स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल व स्वच्छतेचा प्रश्न सुटेल.
ही मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बोरले (सॅनटी) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी रेहान आरिफ शेख, कार्तिक कंडारकर, गजानन कंडारकर, सोनू केने, रोशन सुवर्णकार, जुबेर खान यांसह स्थानिक तरुण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नगर परिषदेकडे स्वच्छतेच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.