मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांनी शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी पार्क केलेली वाहने हलवली जात असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदान परिसरात ठाण मांडले असून तिथे शिस्तबद्ध वातावरण ठेवण्यावर भर दिला जात आहे.
आंदोलनादरम्यान अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर पाटील यांनी आपल्या वकिलांशी चर्चा केली असून, कायदेशीर मार्गाने पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याचे सांगितले.
“आमचे आंदोलन पूर्णपणे शांततेत व लोकशाहीच्या मार्गाने सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही,” असा ठाम इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबईतील काही भागात वाहतुकीला दिलासा मिळत आहे. मात्र आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.