![]() |
स्वप्नांना नवे पंख – कोलते कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राममधून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचा ध्यास |
मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. पहिल्या वर्षाच्या नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी भव्य इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन महाविद्यालयाच्या भव्य ग्रंथालयात व सेमिनार हॉल मध्ये नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा परिचय, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रमाची मांडणी, प्रयोगशाळा व ग्रंथालयाच्या सुविधा तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून समाजासाठी उपयुक्त तंत्रज्ञान निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थी जर मेहनतीने अभ्यास करतील तर ते उद्याचे यशस्वी अभियंते होतील.”प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिस्त, नियम व सकारात्मक वातावरणाची ओळख करून दिली. तसेच “विद्यार्थी फक्त वर्गापुरते मर्यादित न राहता क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होईल” असे ते म्हणाले.आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण व आत्मविकासाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना विभागांची माहिती दिली व करिअरच्या नव्या वाटा दाखवल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळे संवाद साधत “तंत्रज्ञान हे जग बदलणारे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्षमतेला संधी मिळेल. संशोधन, नवनवीन प्रकल्प व उद्योजकतेच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाच्या प्रगतीस हातभार लावतील” असा विश्वास व्यक्त केला. खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांनी आपल्या मनोगतात “महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा व आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर आहे. आर्थिक पारदर्शकता व शैक्षणिक गुणवत्तेमुळे महाविद्यालयाने पालक व समाजाचा विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास टिकवणे व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेणे हेच आमचे ध्येय आहे” असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्षांचे प्रमुख प्रा. नितीन खर्चे व प्रा. मो. जावेद सह त्यांचा सहकारी प्राध्यापक वर्ग यांनी यशस्वीपणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ख्याती चौधरी तर आभार प्रदर्शन प्रा. शारदा लांडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तंत्रनिकेतन प्राचार्य प्रा. संदीप खाचणे, लायब्ररी इन्चार्ज प्रा. संगीता खर्चे, प्रा. योगेश सुशीर, डॉ. अमोघ मालोकार, प्रा. सुदेश फरफट, प्रा. संतोष शेकोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात पालक वर्ग व विद्यार्थी यांची प्रचंड उपस्थिती होती. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून महाविद्यालयाच्या प्रगतिशील वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या इंडक्शन प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा, आत्मविश्वास व उत्साह संचारला.