मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी
नांदवेल फिटर अंतर्गत येणारी नांदवेल, वायला, टाकळी वडगाव, मालखेडा, निमखेडी बु, इच्छापूर आदी गावे सातत्याने वीज समस्यांना सामोरी जात आहेत. इच्छापुर येथील सब-स्टेशनमधून वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. मात्र संबंधित ऑपरेटरकडून केवळ उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असून, प्रत्यक्षात वेळेवर दुरुस्ती केली जात नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी फिटरमध्ये वायरमन कायमस्वरूपी हजर राहणे गरजेचे आहे. मात्र सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना वीज समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नांदवेल फिटरमधील ग्रामस्थांनी सरपंच शीतल गणेश सोनवणे, उपसरपंच प्रमोद इंगळे तसेच निमखेडी बु ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळेसही वायरमन हजर ठेवावा, अशी ठाम मागणी केली आहे.