![]() |
अवैध बायोडिझेल विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 3200 लिटर बायोडिझेलसह 5.86 लाखांचा मुद्देमाल जप्त, 07 जणांविरुद्ध गुन्हा दाखल |
बुलढाणा : जिल्ह्यात अवैधरित्या बायोडिझेलचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 3200 लिटर बायोडिझेल व साहित्य असा 5,86,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 07 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी दिलेल्या आदेशानुसार पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक मोहीम राबविली.
मलकापूर शहरातील कारवाई
मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील धरणगाव शिवार परिसरातील हॉटेल फौजी धाव्याजवळ लोखंडी टाक्यामध्ये बायोडिझेलचा साठा करून विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या वेळी सय्यद अब्दुला सय्यद याकुब (रा. पारपेठ, मलकापूर) यास ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 1200 लिटर बायोडिझेल व साहित्य असा 2,64,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सय्यद अब्दुला सय्यद याकुब व शेख इम्रान शेख इस्माईल (रा. बारादरी, मलकापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसरखेड एमआयडीसीतील कारवाई
त्याच दिवशी रनथम शिवारातील हॉटेल एकता समोरील परिसरात बायोडिझेलचा अवैध साठा आढळून आला. येथे इम्रान खान फिरोज खान (रा. बेरजाली, मैदपुर, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. छाप्यातून 2000 लिटर बायोडिझेल व साहित्य असा 3,22,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इम्रान खान फिरोज खान याच्यासह लखन पांचाळ (रा. रतलाम, मध्यप्रदेश), शाकीर खान मास्टर (रा. उज्जैन, मध्यप्रदेश), मो. नईम शेख (रा. जळगाव), अरर्शद तेली (रा. गुजरात) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड व श्री. श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्था.गु.शा. बुलढाणा पथकाचे पोउपनि. अविनाश जायभाये, पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, पोहेकॉ. शेख चांद, पोहेकॉ. गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, चालक पोकॉ. निवृत्ती पुंड यांनी सहभाग घेतला.